न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कळंब (ता. इंदापूर) (दि. ९ सप्टेंबर २०२५) :- कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने एक दिवसीय योग कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रणित वाबळे यांनी मार्गदर्शन करताना आजच्या विज्ञानयुगात माणसाचे जीवन औटघटकेचे कसे होत चालले आहे, यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की सात्विक आहार, श्वासावर नियंत्रण व नियमित योगाभ्यास यामुळे जीवन आनंदी आणि आरोग्यपूर्ण राहते. अन्यथा निद्रानाशासारख्या त्रासामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. प्राणायाम, मर्मचिकित्सा यांचे महत्त्व स्पष्ट करून ताणतणावमुक्त जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी कृत्रिम जीवनशैली टाळून नैसर्गिक पद्धतीने जगण्याचा सल्ला दिला. प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व्यायाम, आहार व झोप यांचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी केले व आभार मानले. या वेळी प्राध्यापक वृंद, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













