न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२५) :- चिखली कुदळवाडी सर्कल येथे भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
फिर्यादी शंकर देवासी (रा. पुनावळे, पुणे) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ रेवैताराम देवासी (वय ३२, रा. डुडुळगाव) व त्यांची पत्नी संतोषदेवी (वय २९) हे दुचाकीवरून पुनावळे येथे जात होते. दरम्यान, कुदळवाडी सर्कल येथे एका अज्ञात वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवत त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात रेवैताराम यांच्या डोक्यास व कानाला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले, तर पत्नी संतोषदेवी यांच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर वाहनचालक अपघातस्थळावरून पीडितांना मदत न करता फरार झाला.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पाषाणकर करीत आहेत.













