- राष्ट्रीवादीच्या अजित गव्हाणेंचा गौप्यस्फोट..
 - छाननी दरम्यान बारा हजार दुबार मतदारांची नावे उघडकीस…
 - निवडणूक विभागाला यादी सुपूर्द…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी, (दि. ४ नोव्हेंबर २०२५) :- मतदार यादीतील गोंधळ आणि दुबार नोंदीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच गाजू लागला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर मतदार यादीतील घोळ समोर आणल्यानंतर आता राज्यात आणि स्थानिक पातळीवरही या विषयावर मोठी हालचाल सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदार यादीतील तब्बल बारा हजार दुबार नावे शोधून काढली असून, ही यादी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे सादर केली आहे. त्यामुळेमतदार यादीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही केवळ प्राथमिक आकडेवारी असून, प्रत्यक्ष छाननीनंतर फक्त भोसरी मतदारसंघाचा हा आकडा लाखभरांपर्यंत जाऊ शकतो. “शहरात नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झालेले नागरिक इतर जिल्ह्यांत वास्तव्यास असूनही त्यांची नावे शहराच्या मतदार यादीत कायम आहेत. तसेच काही नावे मुद्दामून पुन्हा-पुन्हा टाकल्याचे दिसते, ज्यामुळे निवडणुकीदरम्यान मतदारसंख्येत कृत्रिम वाढ होते,” असे गव्हाणे यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. विशेष टीम गठीत करून छाननीचे काम सुरू करण्यात आले आहे.
गव्हाणे म्हणाले, “हा विषय फक्त भोसरीपुरता मर्यादित नाही. पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातच मोठ्या प्रमाणावर दुबार नोंदी झालेल्या आहेत. या चुकीच्या नोंदींमुळे निवडणुकांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आम्ही संबंधित विभागाला संपूर्ण माहिती दिली असून, सर्व दुबार नावे तातडीने वगळावीत, अशी आमची मागणी आहे.”
पिंपरी-चिंचवडसह भोसरी मतदारसंघात आता मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेला वेग आला असून, आगामी निवडणुकांपूर्वी या प्रक्रियेला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
                                                                    
                        		                    
							












