न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १० सप्टेंबर २०२५) :- भोसरी येथे महादेव गॅस सर्विस दुकानात जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याचे उल्लंघन करून अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा धंदा सुरू असल्याचे उघड झाले. त्यावरून पिंपरी चिंचवड गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून सुमारे ५ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा अवैध गॅस साठा आणि साहित्य जप्त केले.
ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० च्या सुमारास करण्यात आली. याबाबत किरण अर्जुन जाधव (पोलीस हवा, वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी विजय धर्मराज संकुडे (वय ३२, रा. च-होली फाटा, पुणे) याने घरगुती वापराचे गॅस सिलेंडर खरेदी करून मोठ्या टाक्यांतून धोकादायक पद्धतीने ४ किलोच्या छोट्या टाक्यांत गॅस भरण्याचे काम सुरू केले होते. यावेळी कोणतीही सुरक्षेची खबरदारी न घेता केलेल्या या कृत्यामुळे स्थानिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. तपासात उघड झाले की आरोपी हा गॅस ट्रान्सफर करून लहान टाक्या महाग दराने विक्री करत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून गॅस टाक्या, रिफिलिंग सर्किट, टेम्पो यासह साहित्य जप्त केले. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि टापरे तपास करीत आहेत.













