- नव्या शहरी मतदारवर्गाचा प्रभाव वाढला..
- ‘शहरकेंद्रित नेतृत्व’ की ‘गावकेंद्रित परंपरा’; राजकीय पक्षांची सत्वपरिक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ५ नोव्हेंबर २०२५) :- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, यावेळी ‘गावकी-भावकी’च्या चौकटीतून बाहेर पडण्याची गरज सर्वच पक्षांसमोर उभी ठाकली आहे.
गेल्या दोन दशकांत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी भागांतील नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले आहेत. आता ते केवळ मतदार नव्हे, तर उमेदवार म्हणूनही पुढे येऊ इच्छितात.
राजकीय जाणकारांच्या मते, शहराचे बदलते शहरी स्वरूप पाहता पारंपरिक समीकरणांवर निवडणूक लढवणे धोक्याचे ठरू शकते. मतदार वर्ग आता अधिक विवेकी आणि शहरकेंद्रित झाला आहे. एका पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, “गावकीचे राजकारण मोडणे कठीण असले तरी त्याची वेळ आली आहे. शहर हे सर्वांचे आहे.”
दुसरीकडे, काही स्थानिक नेते मात्र आपल्या भागातील उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे, यावर ठाम आहेत. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत नवे आणि पारंपरिक गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ‘शहरकेंद्रित नेतृत्व’ की ‘गावकेंद्रित परंपरा’ यावरच भावी राजकारणाची दिशा ठरणार आहे.













