- हातगाड्या, पथारी, चायनीज सेंटर व टपऱ्या हटवल्या; रस्ता मोकळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. ११ सप्टेंबर २०२५) – पुणे-नाशिक महामार्गालगत मोशीतील शिवाजीवाडी रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणांवर बुधवारी (१० सप्टेंबर) महापालिकेने धडक कारवाई केली. पादचारी मार्गावर उभारलेले स्टॉल्स, हातगाड्या, टपऱ्या आणि छोटे व्यवसायिकांनी ठेवलेले साहित्य हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी व पादचारी त्रासाबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. यानंतर ‘ई’ प्रभागाच्या टीमने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. या कारवाईत पाच हातगाड्या, तीन पथारी, चायनीज सेंटर, चहाची टपरी, पानपट्टीसह एकूण १८ अतिक्रमणे हटवण्यात आली.
“महापालिकेच्या सारथी अॅपवर नागरिकांकडून शिवाजीवाडी रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार कारवाई करून रस्ता मोकळा केला आहे. पुढेही ही मोहीम नियमित सुरू राहील,” असे क्षेत्रीय अधिकारी तानाजी नराळे यांनी सांगितले.
या कारवाईत अतिक्रमण निरीक्षक प्रवीण लांडे, स्थापत्य अभियंता सहायक, १९ एमएसएफ जवान, दोन पोलिस कर्मचारी आणि महापालिकेचे १२ अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. सध्या रस्ता मोकळा असला तरी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित पाहणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.













