- चार तासांत हरकतींची सुनावणी आटोपली..
- सुनावणीपेक्षा ठरला औपचारिकता पूर्ण करण्याचा कार्यक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर आलेल्या शेकडो हरकती व सूचनांवर बुधवारी (दि. १०) फक्त चार तासांत सुनावणी आटोपली. अनेक अर्जदारांनी प्रभाग मोडतोडीच्या चुका दाखवत बदलांची मागणी केली.
सुनावणी ऑटो क्लस्टर सभागृहात झाली. प्राधिकृत अधिकारी प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली असली तरी महापालिकेचे आयुक्त व निवडणूक अधिकारी शेखर सिंह अनुपस्थित होते. ते लेह-लडाखच्या दौऱ्यावर असल्याचे प्रशासनाने सांगितले. निवडणुकीतील महत्त्वाच्या प्रक्रियेला निवडणुक अधिकारी गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सभागृहात अपेक्षित गर्दी नव्हती. अर्जदारांपेक्षा महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, सुरक्षारक्षकच अधिक दिसत होते. अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्या. एवढ्या गंभीर सुनावणीत नागरिकांऐवजी महापालिकेचा जमावच ठळकपणे जाणवत होता.
शाहूनगर-संभाजीनगर-मोरवाडी प्रभाग क्रमांक १० संदर्भात सर्वाधिक ११५ हरकती नोंदल्या गेल्या. चिखली गावठाण प्रभाग क्रमांक १ साठी ९८, तर संत तुकारामनगर-कासारवाडी-पिंपरी प्रभाग क्रमांक २० साठी ३२ हरकती आल्या. काही प्रभागांवर एकही हरकत नव्हती.
विशेष म्हणजे, ओळखपत्र नसल्यामुळे काही अर्जदारांना प्रवेश नाकारला गेला. यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेकडे पाहता, सुनावणीपेक्षा ती “औपचारिकता पूर्ण करण्याचा कार्यक्रम” असल्याची टीका अर्जदारांकडून होत आहे. आता प्रशासन आवश्यक बदल करून अंतिम प्रभागरचना राज्य शासनाकडे पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे.













