- ‘आई’ सन्मान सोहळ्यात मातृशक्तीचा गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू │ १२ सप्टेंबर २०२५ :- आईच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. आई ही ईश्वरी शक्ती असून तिच्यापुढे आपण सदैव नतमस्तक असतो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व युवा कीर्तनकार हभप सचिन महाराज पवार यांनी केले. ते देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सृजन फाउंडेशन व कंद परिवार आयोजित ‘आई सन्मान सोहळ्या’त बोलत होते.
या वेळी हौसाबाई सहादू काळोखे, हिराबाई विष्णू काळोखे, धोंडाबाई कृष्णा परंडवाल, आशाताई श्रीकांत मोरे, सिंधुबाई चिंतामण पचपिंड आणि अनिताताई सुरेश हगवणे या आदर्श मातांचा ‘आई’ सन्मानाने गौरव करण्यात आला. आदर्श माता शांताबाई मोहन काकडे, समाजसेविका डॉ. शिल्पाताई मापुस्कर नारायणन्, प्राचार्या डॉ. कविता अय्यर, धर्माचार्य हभप शंकर महाराज शेवाळे यांच्या शुभहस्ते गाथा, शाल, सन्मानपत्र व मानाची साडी देऊन सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. या आई सन्मान सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे, गोडूम्ब्रे येथील वि.वि. कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय सावंत, माजी सरपंच अशोकराव मोरे, माजी चेअरमन अभिमन्यू काळोखे, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार संजय भसे, कामगार नेते मच्छिंद्र हगवणे, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मातृशक्तीविषयी अंत:करणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा व आईविषयी आपल्या हृदय कोंदणात असलेल्या अनंत आठवणींना उजाळा देणाऱ्या या वात्सल्याच्या भावपूर्ण सोहळ्याचे साक्षीदार म्हणून कंद परिवारचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक केले. सौ.
वृषाली आढाव यांनी आपल्या सुमधुर, रसाळ वाणीने सर्व सन्मानपत्राचे वाचन केले. सौरभ कंद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर मानसी कंद यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.













