न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई │ १२ सप्टेंबर २०२५ :- मावळ तालुक्यातील पर्यटनाला नवे रूप मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात लोणावळा येथील कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट पर्यटन प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या प्रकल्पासाठी ३३० कोटी रुपयांची मंजुरी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच मिळाली असून, अंमलबजावणीसाठी गती देण्यात येणार आहे.
या प्रकल्पात प्रवेशद्वार, टिकीट घर, फूड कोर्ट, वाहनतळ, समारंभ हॉल यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच झिप लाईन, बंजी जंपिंग, वॉल क्लायम्बिंग, फेरीस व्हील असे साहसी खेळ उपलब्ध होणार आहेत. मनोरंजनासाठी झुला, रेन डान्स, स्केटिंग रिंक, सीसीटीव्ही, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना यांचा समावेश होईल. पर्यटकांसाठी स्कायवॉक व टेंटिंगसारख्या मुक्कामाच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत.
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन मावळ तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्रींकडे पाठविला जाणार आहे. “हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोणावळा व मावळचे पर्यटन राज्यात वेगळ्या उंचीवर जाईल,” असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.













