- देहू-आळंदीसह पिंपरी-चिंचवड शहरातील हे भागही मेट्रोपासून वंचीत..
- आत्ताच प्रस्तावित मार्गात बदल करून विस्ताराची होतेय मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड │ १२ सप्टेंबर २०२५ :- पुणे मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालिका क्षेत्रातच होत असून, पिंपरी-चिंचवडला दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना शहरातील नागरिकांमध्ये वाढत आहे.
सध्या कार्यरत असलेले ८० टक्के मेट्रो मार्ग पुणे महापालिका हद्दीत येतात. पुणे शहरातील प्रत्येक भाग मेट्रोशी जोडला जावा यासाठी प्रयत्न होत असताना, पिंपरी-चिंचवडमधील गजबजलेला परिसर मात्र मेट्रोच्या मुख्य जाळ्यापासून दूर आहेत.
दरम्यान, महामेट्रोने निगडी-चाकण मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पिंपरी-चिंचवड महापालिकेला सादर केला आहे. मात्र, या मार्गासोबतच नागरिकांनी आणखी काही महत्त्वाच्या मार्गांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
त्यामध्ये निगडी-कृष्णानगर-कुदळवाडी चौक-आळंदी-चऱ्होली मार्ग तसेच देहू-तळवडे-चिखली-शाहूनगर-काळेवाडी-वाकड-हिंजवडी पूल मार्ग प्राधान्याने समाविष्ट करावा, असा नागरिकांचा आग्रह आहे.
या मार्गांच्या अंमलबजावणीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी, तळवडे, चिखली, शाहूनगर, काळेवाडी, वाकड अशा प्रमुख भागांना मेट्रोद्वारे थेट जोडले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थाने असलेल्या माऊलींची आळंदी व तुकोबांची देहू मेट्रो नेटवर्कवर येतील. तसेच तळवडे आयटी पार्क व हिंजवडी आयटी पार्क थेट कनेक्ट होतील, ज्यामुळे हजारो आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सोयीस्कर होईल.
याशिवाय, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, प्रस्तावित सिव्हिल कोर्ट, मोशी कृषी बाजार समिती, नवीन पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय या महत्त्वाच्या ठिकाणीही मेट्रोची थेट सुविधा मिळेल. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल, वाहतूककोंडी कमी होईल आणि पिंपरी-चिंचवडमधील मोठा परिसर मेट्रोशी प्रभावीपणे जोडला जाईल. आत्ताच प्रस्तावित मार्गात बदल करून हा विस्तार झाला पाहिजे; अन्यथा ही संधी पुन्हा मिळणार नाही..













