न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने सेवाकर वसुलीत विक्रमी यश मिळवले आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजीविका केंद्राशी संलग्न महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत मार्च २०२५ पासून झोपडपट्टीवासियांना सेवाकर बिलांचे वितरण सुरू करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत तब्बल ७६ लाख ८३ हजार ३९७ रुपये महसूल जमा झाला आहे.
या मोहिमेमुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून मोबाईल अॅपच्या सहाय्याने बिल वितरण व माहिती संकलनाची पारदर्शक प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे झोपडपट्टीवासियांना वेळेवर बिल मिळत असून सेवाकर भरण्याबाबतची जबाबदारी वाढली आहे.
आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये ३९ लाख, २०२३-२४ मध्ये २९ लाख महसूल मिळाला होता. २०२४-२५ मध्ये तो उडी घेत ४५ लाख ५४ हजार रुपये झाला. तर चालू आर्थिक वर्षात पाच महिन्यांतच जवळपास ५७ लाख ७९ हजार रुपये महसूल जमा झाला आहे. महापालिकेच्या मते, हा उपक्रम महसुलवाढीबरोबरच महिलांच्या सबलीकरणाचे प्रतीक ठरत आहे.












