- ३ हजार ढोल, १ हजार ताशा आणि ५०० भगवे ध्वजांसह गगनभेदी निनाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड । १२ सप्टेंबर २०२५ :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती शिल्प ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ उभारणीच्या दिशेने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या शिल्पाला मानवंदना म्हणून तब्बल ३ हजार ढोल, १ हजार ताशा आणि ५०० भगवे ध्वज यांच्या गगनभेदी निनादाने मोशी येथे दणका बसणार आहे.
बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील पीएमआरडीएच्या जागेत पिंपरी-चिंचवड महापालिका व राज्य शासनाच्या मान्यतेने हे स्मारक उभारत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे.
रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. तसेच, २ ऑक्टोबर रोजी महाराजांच्या तलवारीचे शस्त्रपूजन होणार असल्याची माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश भुजबळ यांनी दिली.
हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट व ढोल-ताशा महासंघाच्या वतीने सर्व शिव-शंभूप्रेमींना या भव्य सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













