न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ सप्टेंबर २०२५) :- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने तरुण पिढीला लोकशाही मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रविकासाशी जोडण्यासाठी ‘युवा जोडो अभियान’ हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबवला जाणारा हा उपक्रम तरुणांना समाजकार्य आणि धोरण प्रचारात सक्रिय सहभाग देण्यासाठी प्रेरित करणार आहे.
१० आणि ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथील टिळक भवन येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत या अभियानाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी नवज्योत संधू व शांभवी शुक्ला यांच्यासह सर्व जिल्हा व विधानसभा पदाधिकारी उपस्थित होते.
या अभियानाचा उद्देश तरुणांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडणे, त्यांना त्यांच्या स्वप्नांना व समस्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्रिय योगदानाची संधी देणे हा आहे.
शिवराज मोरे म्हणाले, “तरुण ही देशाची खरी ताकद आहे. या अभियानातून आम्ही त्यांना समाजकार्याच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रनिर्माणासाठी पुढे नेत आहोत.”













