- एक ठार, अनेकजण जखमी; दोन्ही गटांकडून परस्पर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२५) :- ताथवडे येथील एका कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पमध्ये दारूच्या नशेत दोन गटांत झालेल्या वादातून गंभीर हिंसाचार झाला. या हाणामारीत एका मजुराचा मृत्यू झाला असून दोन्ही बाजूंकडील अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल झाले असून एकूण दहा जणांवर खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत १४ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी सुकरा संगा इतवा मुंडा (२१, रा. झारखंड) याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, शेजारील बिहारी मजुर दारू पिताना आरडा ओरडा करत असल्याने त्यांना ओरडू नका असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी माणिकचंद परिहार, आनंद परिहार, मिथुन परिहार आणि ब्रह्मदेव परिहार यांनी फिर्यादी व त्याच्या साथीदारांवर लाथाबुक्यांसह लोखंडी पाईप व हत्यारांनी हल्ला केला. यात आरोपींनी खैरा हुरो याच्या डोक्यात लोखंडी हूकने प्रहार करून गंभीर जखमी केले. तसेच मसिह सोमरा मुंडा (४०) याच्या डोक्यात मारहाण करून त्याचा मृत्यू घडवला. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याच दुसऱ्या घटनेबाबत दुसऱ्या बाजूने फिर्यादी मिथुन उमेश परिहार (३२) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, झारखंडच्या मजुरांनी दारूच्या नशेत आरडा ओरडा करताना झालेल्या वादात फिर्यादीसह त्याचे साथीदार आनंद परिहार, माणिक परिहार, करण परिहार व शामकुमार परिहार यांच्यावर हातोडी, लोखंडी सळई व हूकसारख्या घातक शस्त्रांनी हल्ला केला. यात सर्व जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी आरोपी महादेव मुंडा, विजय मुंडा, तागु हुरो, शाम मुंडा, मसिह मुंडा आणि खैरा हुरो यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या दुहेरी गुन्ह्यांमुळे दारूच्या नशेतून झालेल्या क्षुल्लक वादाचे भीषण वादात रूपांतर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या दोन्ही बाजूंचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोनि किशोर पाटील करत आहेत.













