- चिंचवड व चिखलीत दोन वेगवेगळ्या घटनांत मालकांचा विश्वासघात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांत दोन वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, तब्बल १७ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. चिंचवड व चिखली भागातील या घटनांनी व्यवसायिक व नागरिकांमध्ये खळबळ उडवली आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी रोहित पुरी यांच्या डी.सी.सी. इन्फोटेक प्रा. लि. कंपनीत अकाऊंटन्ट म्हणून कार्यरत असलेल्या रोहन अजिंक्य (रा. तळेगाव) याने २०२३ पासून एप्रिल २०२५ या काळात १५ ग्राहकांकडून मिळालेली १० लाख ५७ हजार ७७९ रुपयांची रोकड कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहे.
तर दुसऱ्या घटनेत चिखली पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, विलास फटांगरे यांच्या वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या धनंजय जेवे (रा. बीड) या कामगाराने कामगारांचा पगार व गहाण सोडवण्यासाठी घेतलेले पैसे तसेच क्रेडिट कार्डद्वारे मिळवलेली रक्कम मिळून एकूण ७ लाख ३३ हजार ३०० रुपयांचा अपहार केला. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून ही फसवणूक केली असून तो अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही.
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींनी नोकरीवर असताना विश्वासघात करून लाखोंचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंचवड व चिखली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
















