- २७ वर्षीय महिलेने एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म..
- आई व चारही बालके ठणठणीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सातारा (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्मिळ घटनेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. कोरेगाव तालुक्यातील २७ वर्षीय काजल विकास खाकुर्डिया या महिलेने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. विशेष म्हणजे याआधी पाच वर्षांपूर्वी तिने तीन अपत्यांना जन्म दिला होता. त्यामुळे तिच्या पदरात आता एकूण सात अपत्य आले आहेत.
काजल ही मूळची गुजरातची असून सध्या सासवड येथे वास्तव्यास आहे. बाळंतपणासाठी ती माहेरी साताऱ्यात आली होती. सी-सेक्शनद्वारे डिलिव्हरी पार पडली असून सुदैवाने या प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आली नाही. आई व चारही बालकांची प्रकृती सध्या ठणठणीत आहे. काजलचा पती विकास खाकुर्डिया गवंडी म्हणून काम करतो.
या दुर्मिळ प्रसूतीसाठी डॉ. सदाशिव देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. तुषार मसराम, भूलतज्ज्ञ डॉ. नीलम कदम, डॉ. दिपाली राठोड यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा रुग्णालयात एका मातेच्या पोटी चार बाळांचा जन्म हा पहिलाच अनुभव असल्याने डॉक्टर व नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला.
ही दुर्मिळ घटना समजताच परिसरातील नागरिकही चकित झाले असून, जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळ्याचे वातावरण निर्माण झाले आहे.















