- अधिसूचना प्रसिद्ध, ५० लाख दस्तांना दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १८ सप्टेंबर २०२५) :- राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत हद्दीत तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, या निर्णयामुळे अंदाजे ५० लाख दस्तांना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. येत्या पंधरा दिवसांत या प्रक्रियेसाठी कार्यपद्धती जाहीर होणार असून, त्यानंतर एक-दोन गुंठे जमिनीची खरेदी-विक्री अधिकृतरीत्या शक्य होईल.
महाराष्ट्र जमीन धारणा कायदा १९४७ अंतर्गत तुकडेबंदीबाबत निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती नेमली होती. तिच्या अहवालानंतरच अधिसूचना काढण्यात आली. या अधिसूचनेनुसार, महापालिका तसेच प्राधिकरण व प्रादेशिक आराखड्याच्या हद्दीत असलेल्या निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर अकृषिक क्षेत्रांमध्ये तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही. गावांच्या हद्दीपासून २०० मीटरपर्यंतचा परिसरही यामध्ये समाविष्ट आहे.
महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा उपक्रमाच्या उद्घाटनावेळी बावनकुळे यांनी ही घोषणा करताच, मागील तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.