- भुगांव ग्रामपंचायत सभागृहात संतापजनक प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भुगांव, (दि. १८ सप्टेंबर २०२५) :- भुगांव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामसेवकाला शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात कैलास चोंधे (रा. चोंधे-दरा, भुगांव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
१७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने ग्रामसभा झाली. त्या वेळी आरोपीने दक्षता समिती (झोल कमिटी) स्थापन करण्याचा ठराव मांडला. मात्र, ही विशेष ग्रामसभा असल्याने असा ठराव मांडता येणार नाही, असे ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ भोंग (वय ५५) यांनी सांगितले. यावरून संतापलेल्या आरोपीने त्यांना शिवीगाळ केली, दमदाटी केली तसेच शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.
फिर्यादी सरकारी कामकाज पार पाडत असताना अडथळा आणल्याने आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.