- ठेकेदार आणि दुरुस्ती संस्थेला धरले जबाबदार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२५) :- निगडीमध्ये चेंबरमध्ये गुदमरून झालेल्या तिघा कामगारांच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेने तयार केलेला चौकशी अहवाल आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
या अहवालात ठेकेदार तसेच देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या संस्थेची गंभीर बेपर्वाई अधोरेखित केली असून, निष्काळजीपणामुळे कामगारांचा बळी गेल्याचे नमूद केले आहे. राष्ट्रीय सफाई आयोगाच्या आदेशानंतर ही चौकशी करण्यात आली असून, अहवाल आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत तिन्ही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात विलंब केला होता. मात्र आयोगाने दखल घेतल्यानंतर ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटकही झाली. महापालिकेकडून स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीत उपायुक्त संदीप खोत, सह-शहर अभियंता (पर्यावरण) संजय कुलकर्णी व बापू गायकवाड यांचा समावेश होता.
चौकशीदरम्यान असे स्पष्ट झाले की, चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. त्याची योग्य देखभाल न झाल्याने विषारी वायू निर्माण झाला आणि दुर्घटना घडली. कामगारांना पीपीई किट तसेच प्रशिक्षण न देता कामावर लावले गेले, ही नियमावलीची थेट पायमल्ली होती. चेंबरची स्वच्छता आणि देखरेख करण्याची जबाबदारी बीएसएनएलची असतानाही ती पार पाडण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप समितीच्या निरीक्षणात नमूद आहे.