- स्कॉर्पिओ चालवताना बेफिकिरी, आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड, पुणे (दि. १८ सप्टेंबर २०२५) :- वाकडमध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या धडकेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही दुर्घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता सखाराम चौक ते भुजबळ चौक मार्गावर, वाकड हॉस्पिटलसमोर घडली.
मनोहर बारकू शितकल (वय ४९, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिल्यानुसार, आरोपी दिनेश श्रीधर वाळुंजकर (वय ३८, रा. वाकड गांवठाण) याने आपली स्कॉर्पिओ निष्काळजीपणे पुढे घेतली.
गाडीचे पुढे-मागे पाहण्याची खबरदारी न घेतल्यामुळे चेंबरची छिद्रे स्वच्छ करत असलेले कामगार मुकेश कोंडीराम रणपीसे (वय ४९, रा. गुरव पिंपळे) यांना गाडीने ठोकर दिली. अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
भारतीय न्याय संहिता कलम १०५ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.