न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत भव्य रक्तदान ‘अमृत महोत्सव’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात २७५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, माजी महापौर उषाताई ढोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय जैन संघटना, तेरापंथी युवक परिषद तसेच भाजप पदाधिकारी, महिला आघाडी व युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संयोजक जयदिप खापरे, सहसंयोजक नामदेव पवार व विनोद मालू यांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले. रक्तदान शिबिरासाठी कार्यकर्त्यांचे मोठे योगदान लाभले.