- उमेदवारांची नावे कमिटीमार्फतच अंतिम होणार?..
- या पाच सदस्यीय समितीत यांचा होऊ शकतो समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून ‘कार्ड कमिटी’ची स्थापना होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.
या पाच सदस्यीय समितीत आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, विधानपरिषद सदस्य उमा खापरे, अमित गोरखे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या समितीमार्फत उमेदवारांच्या नावांची छाननी होऊन मगच ते पक्षश्रेष्ठींकडे त्या नावांची शिफारस करतील. त्यानंतरच अधिकृत उमेदवारांची नावे जाहिर होतील.
निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने मात्र सर्व जागांवर डोळा ठेवत संघटनात्मक तयारी पूर्ण केली असल्याचा दावा शहराध्यक्ष काटे यांनी केला. त्यांच्या मते, शहर भाजपतर्फे आतापर्यंत तीन वेगवेगळे सर्व्हे करण्यात आले असून, त्यामध्ये पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
सन २०१७ मध्ये ७७ जागांवर विजय मिळवत सत्तेवर आलेल्या भाजपने यंदा पुन्हा स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. युतीसंदर्भातील अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर होईल, असे काटे यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षातील तसेच काही युतीतील कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, त्यांचा प्रवेश पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊनच होईल, हे त्यांनी स्पष्ट केले.
कार्ड कमिटीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षश्रेष्ठींकडूच या कमेटीची रचना होते. साधारण पुढील महिन्यात प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतरच याचा निर्णय होईल. – मा. शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष – पिंपरी-चिंचवड शहर भाजपा…