न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आमदार अमित गोरखे यांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबवण्यात आला. ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेवर आधारित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘संघ शताब्दी पंचसूत्री’ मधील ‘पर्यावरण’ या प्रमुख विषयाचा समन्वय साधत, शाहूनगर येथील शिव शाहू शंभो उद्यानात ५० फुटी अश्वत्थ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. हा ऐतिहासिक सोहळा माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पार पडला, जो मातृशक्तीच्या सन्मानाचा अनोखा संदेश ठरला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, तिच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवणे हा होता. हा उपक्रम डी वाय पी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला, ज्यात संचालक दत्तात्रय यादव यांचीही उपस्थिती होती. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पर्यावरण संरक्षणास हातभार लावणे हे या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट होते.
याप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “आई ही आपल्या जीवनाची पहिली गुरू आहे. तिच्या निस्वार्थ सेवेला कृतज्ञतेने अभिवादन करण्याचा हा उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आपण सर्वांनी आपल्या मातृनावाने झाड लावले, तर प्रत्येक घरातून हरित संदेश समाजापर्यंत पोहोचेल. हे झाड मातृस्मृतीचे स्मारक ठरेल आणि पुढील पिढ्यांना स्वच्छ, हरित वारसा मिळवून देईल.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘संघ शताब्दी पंचसूत्री’ मधील पर्यावरणविषयक संकल्पना प्लास्टिक मुक्त भारत आणि वृक्षारोपण यावर आधारित असून, त्याला मूर्त रूप देत आमदार गोरखे यांनी हा उपक्रम राबवला.
यावेळी विनोद बन्सल, हेमंत हरहरे, राजू दुर्गे, शीतल शिंदे, गणेश लंगोटे, सुप्रिया चांदगुडे, वैशाली खाडे, अनुराधा गोरखे, मनीषा शिंदे, नेताजी शिंदे, अजित भालेराव, राजेश पिल्ले, धरम वाघमारे, धर्मेंद्र शिरसागर, गुरूदत्त सेवा मंडळाचे शाम मोरे, शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सावरकर मित्र मंडळ पदाधिकारी, वैशाली करंजकर, प्रतिभा जवळकर, अविनाश पाटील, भाऊसाहेब कोकाटे, वाडकर काका, हरिमामा, सपकाळ सर, वाडेकर काका, चेतन बेंद्रे , कविता हिंगे,प्रतिभा जवळकर, संदीप जाधव,दीपाली करंजकर,बी के कोकाटे, अनिता वाळुंजकर, नरेश पंजाबी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.