- प्रदूषणमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी महत्त्वपूर्ण पाऊल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १७ सप्टेंबर २०२५) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि इलेक्ट्रोमोशन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिल्या पेट्रोल ते इलेक्ट्रिक रूपांतरित रिक्षेचे भव्य लोकार्पण पिंपरी येथे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून या रिक्षेचे औपचारिक उद्घाटन झाले.
ही रिक्षा जुन्या पेट्रोल रिक्षेला इलेक्ट्रिक कन्व्हर्शन किट बसवून तयार करण्यात आली असून, हट्ट्याच्या परवानगीसह ती रस्त्यावर धावण्यास पात्र ठरली आहे. उद्यापासून ही रिक्षा प्रवाशांना सेवा देणार असून, प्रदूषण नियंत्रणासोबतच रिक्षाचालकांच्या आर्थिक भारातही दिलासा देणार आहे. कार्यक्रमापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा फुले स्मारकापर्यंत शेकडो रिक्षाचालकांच्या सहभागातून रॅली काढण्यात आली.
आमदार अमित गोरखे म्हणाले, “जुन्या रिक्षांना इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय पर्यावरण व आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून अभिनंदनीय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी या उपक्रमाचे उद्घाटन करण्याचा मला सन्मान वाटतो.”
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, नवीन इलेक्ट्रिक रिक्षांना विरोध असला तरी जुन्या रिक्षांचे रूपांतर करून प्रदूषणमुक्त भारतासाठी योगदान देणार आहोत. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, भविष्यात अशा शेकडो रिक्षा इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.