न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद व राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या अधिसूचनेनुसार ‘राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान सेवा पखवाडा’ उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत ८० जणांनी रक्तदान केले तर ३६८ नागरिकांनी हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणीचा लाभ घेतला.
या उपक्रमासाठी वाय.सी.एम. रुग्णालयाच्या रक्तकेंद्रामार्फत शहरात रक्तदान, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच नागरिकांना स्वेच्छिक रक्तदान व अवयवदान करण्याची शपथ देण्यात आली.
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या मोहिमेला डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. तुषार पाटील, डॉ. छाया शिंदे, डॉ. उज्वला अंदुरकर यांसह वाय.सी.एम. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानात सहभाग नोंदवला, ही आनंदाची बाब आहे,” असे डॉ. गोफणे यांनी सांगितले.
















