न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वडगाव मावळ (दि. १९ सप्टेंबर २०२५) :- मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रशासनिक सुविधा बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी एकूण ८५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये टाकवे खुर्द ग्रामपंचायत – ₹२० लाख, कुसगाव बु. ग्रामपंचायत – ₹२५ लाख, सांगिसे ग्रामपंचायत – ₹२० लाख, तर घोणशेत ग्रामपंचायत – ₹२० लाख निधीचा समावेश आहे. या मंजुरीमुळे संबंधित ग्रामपंचायतींना आधुनिक, सुटसुटीत व नागरिकाभिमुख कार्यालयांची उभारणी करता येणार असून, ग्रामस्थांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध होतील.
गेल्या काही महिन्यांपासून या निधीसाठी आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला आहे.
“ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचे केंद्र आहे. सशक्त पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या की ग्रामविकासाला गती मिळते. या निधीमुळे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांना वेळेवर सेवा मिळेल,” असे आमदार शेळके यांनी सांगितले.
या निर्णयाचे ग्रामस्थ व स्थानिक जनप्रतिनिधींनी स्वागत केले असून, “आमदार सुनील शेळके हे खऱ्या अर्थाने विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मावळ तालुक्यात अनेक विकासकामे होत आहेत,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.












