- महापालिका समिती बैठकीत नारायण कुचे यांची सुचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२५) :- अनुसूचित जाती घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख नारायण कुचे यांनी दिले.
पुणे जिल्हा दौऱ्यावर असलेल्या समितीची बैठक आज पिंपरी चिंचवड महापालिकेत पार पडली. बैठकीत आमदार अमित गोरखे, भीमराव केराम, तानाजी मुटकुळे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अनुसूचित जातींच्या कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला. नारायण कुचे यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. स्वतंत्र निधी केवळ संबंधित योजनांसाठी वापरावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सफाई कर्मचाऱ्यांबाबत विशेष उल्लेख करत कुचे म्हणाले, “त्यांच्या प्रश्नांकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. त्यांना हक्काचे हक्क मिळाले पाहिजेत व आरोग्यसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात.”












