न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका, औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण, पोलिस विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पी.एम.आर.डी.ए. या विभागांकडून भेडसावणाऱ्या समस्यांविषयीचे निवेदन पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ व भारत नरवडे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले.
लघुउद्योग संघटनेने उद्योजकांचे पुनर्वसन, सोयीसुविधांची उभारणी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संघटनेने सादर केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :-
- कुदळवाडी व चिखली परिसरातील उद्योजकांना औद्योगिक पार्क उपलब्ध करून देणे व अन्यायकारक कारवाईनंतर आर्थिक भरपाई देणे.
- महापालिकेच्या LBT नोटिसा रद्द करणे, तसेच टी-२०१ प्रकल्पातील गाळे वाटप प्रक्रिया तातडीने सुरू करणे.
- CETP व घातक कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणे, तसेच औद्योगिक परिसरातील रस्ते व भुयारी गटार सुविधा उपलब्ध करून देणे.
- अखंडित वीजपुरवठ्यासाठी सहा नवीन सबस्टेशन उभारणे, जुन्या वीज वाहिन्यांचे अद्ययावतीकरण करणे व मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवणे.
- अनधिकृत माथाडी संघटनांवर कारवाई करून कायमस्वरूपी पोलिस गस्ती पथक राबविणे.
- पी.एम.आर.डी.ए.ने फॅसेलिटी सेंटरची उभारणी करणे व ट्रान्सफर चार्जेस वाजवी दराने आकारणे.













