न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२५) :- चिंचवड येथील नागसेन नगर झोपडपट्टी, बिजलीनगर परिसरात सोमवारी (दि. २२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोयत्याने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव वैभव असे असून त्याच्यावर त्याचा मेव्हणा व मित्रांनी हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये योगेश अनंता गायकवाड (२५, रा. नागसेन नगर), अनिल आनंद बनसोडे (१९, रा. थेरगाव), महेश आप्पालाल कोळी (१९, रा. चिंचवडेनगर) व एक विधी संघर्षित बालक यांचा समावेश आहे.
सदर आरोपींनी आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून तसेच वैभवने योगेशच्या बहिणीशी केलेल्या प्रेमविवाहाच्या कारणावरून सूड उगवण्यासाठी ही घटना घडवून आणली. दुपारी साडेदोनच्या सुमारास वैभव हा आपल्या ओळखीच्या महिलेच्या घरी गेला असता आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने जबरदस्त हल्ला केला. डोक्यावर, हातावर, नाकावर, तोंडावर व शरीरावर अनेक वार वार करून त्याला जागीच ठार मारण्यात आले.
या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोनि गुन्हे गोसावी हे करत आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.













