- साईभक्तीच्या सेवेखातर शिरगावला प्रतिशिर्डी बनवणारा जनक हरपला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२५) :- मावळ तालुक्यात शोककळा पसरवणारी दुःखद वार्ता समोर आली आहे. माजी आमदार तसेच शिरगाव येथील प्रसिद्ध प्रतिशिर्डी साईबाबा संस्थान चे संस्थापक विश्वस्त प्रकाश देवळे यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाजकारण, शिक्षण व धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
प्रकाश देवळे यांनी शिरगावमध्ये प्रतिशिर्डी साई संस्थानाची स्थापना करून हजारो भाविकांसाठी श्रद्धास्थान उभे केले. या उपक्रमातून त्यांनी समाजात आदर्श कार्याची परंपरा निर्माण केली. त्यांच्या प्रयत्नातून शिरगाव हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात घुमले. शिक्षण व सामाजिक कार्यातही त्यांनी मोठे योगदान दिले.
देवळे यांच्या निधनाची वार्ता कळताच मावळ तालुक्यासह पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक, साईभक्त आणि त्यांच्या अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
आज दुपारी दोन वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचा अंत्यसंस्कार होणार असून, मोठ्या संख्येने नागरिक व साईभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.













