न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. ०७ नोव्हेंबर २०२५) :- सांगवी परिसरात उसने दिलेल्या दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याने एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुनिल नारायण कोंडल (वय ५४, रा. गणेशनगर, सांगवी) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी महिला (वय ५०, रा. विनायक नगर, लेन नं. १, नवी सांगवी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुनिल कोंडल यांनी फिर्यादी व त्यांचे पती उदय सुभाष तेलंग यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेतले होते. या रकमेसाठी दरमहा ३ टक्के व्याज देण्याचे तसेच सहा महिन्यांनी मूळ रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन स्टॅम्प पेपरवर दिले होते.
सुरुवातीला आरोपीने दरमहा ३० हजार रुपयांच्या दराने व्याजाची परतफेड केली; परंतु नंतर व्याज व मूळ रक्कम दोन्ही देणे बंद केले. पैसे मागणीस गेल्यानंतर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतीला दमदाटी केली, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या मानसिक तणावामुळे उदय सुभाष तेलंग यांनी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सपोनि पाटील तपास करीत आहेत.













