- सह जिल्हा निबंधकांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि. ०७ नोव्हेंबर २०२५) :- बावधन परिसरात तब्बल सहा कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्क फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
फिर्यादी संतोष अशोक हिंगाणे (वय ५५ वर्षे), सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी मिळकतीच्या व्यवहारात शासनाला देय असलेले मुद्रांक शुल्क बेकायदेशीररीत्या टाळून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.
२० मे २०२५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास, राजमाता जीजाऊ संकुल, बावधन खुर्द, एनडीए-पाषाण रोड येथील उपनोंदणी कार्यालयात झालेल्या या व्यवहारात, आरोपी क्र. १ — महिला (रा. पिंपरी), आरोपी क्र. २ — दिग्विजय अमरसिंह पाटील (रा. शिवाजीनगर) आणि आरोपी क्र. ३ — रविंद्र बाळकृष्ण तारु यांनी आपसात संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे ₹६ कोटींचे मुद्रांक शुल्क न भरता दस्तऐवज नोंदविला.
सह जिल्हा निबंधकांनी याबाबत ९ मे २०२५ रोजी लेखी पत्राद्वारे या व्यवहारास परवानगीसाठी आवश्यक मुद्रांक शुल्क ₹५,८९,३१,८०० इतके असल्याचे नमूद केले होते. तरीदेखील आरोपींनी शासनाच्या महसुलाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास सपोनि ठाकुर करत असून, शासनाच्या महसुलाला फटका बसवणाऱ्या अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत अधिक चौकशी सुरू आहे.













