- परिसराला आध्यात्मिक ओळख मिळावी, नागरिकांचा आग्रह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२५) :- भोसरी प्रभाग क्रमांक ६ मधील सदगुरुनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराला ‘जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज’ हे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमो उपाध्यक्ष जयदीप करपे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.
सदगुरुनगर येथील प्रवेशद्वाराचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, परिसराला विशिष्ट ओळख मिळावी आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना स्थान ओळखणे सुलभ व्हावे या उद्देशाने हे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत परिसरात ओळख दर्शवणारी ठळक खूण नसल्यामुळे नागरिकांना पत्ता सांगताना गैरसोय होत असल्याचे करपे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
सदगुरुनगर या नावाशी सुसंगत असे संत तुकाराम महाराजांचे नाव हे श्रद्धा, आदर, ज्ञान आणि मार्गदर्शनाचे प्रतीक असल्याने तेच या प्रवेशद्वाराला योग्य ठरेल, असे मत करपे यांनी व्यक्त केले आहे. या मागणीवर महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.













