- ‘एक सूर, एक ताल’ सामुदायिक गायनातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केली देशप्रेमाची भावना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०७ नोव्हेंबर २०२५) :- चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त “एक सूर, एक ताल” या संकल्पनेखाली सामुदायिक स्वरूपात वंदेमातरम गीताचे सादरीकरण करून कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेलं ‘वंदे मातरम’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशभक्ती, एकता आणि मातृभूमीप्रेमाचे प्रतीक ठरले. राष्ट्रगीतासारखेच हे गीतही आदराचे स्थान राखते आणि देशभक्तीची प्रेरणा देणारे म्हणून ओळखले जाते.
या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यभर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम कमला एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी केले. या सामुदायिक गायनात अकरावी व बारावीतील विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. देशाबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त करत सर्वांनी एकतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या आयोजनात क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शबाना शेख, डॉ. अभय पोद्दार तसेच अन्य शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे वातावरण देशभक्ती आणि उत्साहाने भारलेले होते.












