न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आकुर्डी येथील नव्याने उभारलेल्या खाद्यपदार्थ गाळ्यांच्या ई-लिलावासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. महिला व बालकल्याण योजना अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला असून, गाळे महिला बचत गटांना भाडेकराराने देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी २८ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या ई-लिलावासाठी एकूण ४९ गाळे उपलब्ध असून त्यात दिव्यांग महिला बचत गटांसाठी २, तृतीयपंथी गटासाठी १, कोविड योद्धा गटासाठी १, आदिवासींसाठी २, DAY-NULM अंतर्गत ३ आणि उर्वरित ४० गाळे सक्षम महिला बचत गटांसाठी आरक्षित आहेत.
अर्ज करताना सहभाग शुल्क १०,००० रुपये व न परतावा नोंदणी शुल्क ५०० रुपये जमा करावे लागेल. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून इच्छुकांनी तातडीने नावनोंदणी करावी, असे उपआयुक्त ममता शिंदे यांनी सांगितले.












