न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२५) :- जागतिक रेबीज दिन (२८ सप्टेंबर) निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे आणि Mission Rabies च्या सहकार्याने रेबीज लसीकरण सप्ताह २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाचा शुभारंभ नेहरूनगर व निगडी प्राधिकरण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात झाला. या ठिकाणी पाळीव श्वानांचे तर श्वान पथकामार्फत भटक्या श्वानांचे मोफत लसीकरण करण्यात आले. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम सुरू झाला. या वेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दवाखान्यात उपस्थित राहून जनजागृती केली. उपआयुक्त संदीप खोत यांनी विभागातील उपक्रमांबाबत माहिती दिली.
शहरातील रावेत, चिंचवडगाव, मोशी व भोसरी-दिघी परिसरात पशुवैद्यकीय व Mission Rabies पथकांनी शेकडो श्वानांचे लसीकरण केले. जनजागृतीद्वारे रेबीजसारख्या संसर्गजन्य रोगाचे निर्मूलन हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.












