न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ३ ऑक्टोबर २०२५) :- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इ. सातवीच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट श्रीक्षेत्र आळंदी जवळील वडगांव घेनंद येथील ‘स्नेहवन’ या संस्थेत आयोजित केली होती. विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहता याव्यात तसेच त्यांच्या मनात संवेदनशीलता प्रवाहित होऊन सामाजिक भान जागृत व्हावे, हा या अभ्यास भेटीचा उद्देश होता.
स्नेहवन या संस्थेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ केला जातो. आयटी इंजिनीअरची असणारी नोकरी सोडून देत अशोक दादा व अर्चनाताई देशमाने आपल्या कुटुंबासह या संस्थेला चालविण्याचे काम पाहतात. वंचित मुलांचे संगोपन करून, त्यांना शालेय शिक्षण देणे, एवढाच ‘स्नेहवन’ चा उद्धेश नाही, तर या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केला जातो. त्याग, सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार देत, चारित्र्यसंपन्न, आत्मनिर्भर तरुण घडवत, सक्षम भारत उभारण्यात योगदान देण्याचा ‘स्नेहवन’ चा संकल्प आहे.
स्नेहवन मधील मुलांनी दोन एकर मधील संपूर्ण संस्थेची विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. यामध्ये शिक्षणाबरोबरच चित्रकला, संगीत यांसारख्या इतर विषयांचा ही समावेश आहे. याशिवाय मुलांना परदेशी भाषा ही शिकविल्या जातात. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांना आठवड्याला एक पुस्तक वाचून त्याची माहिती सांगणाऱ्याला चित्रपट दाखवला जातो. यानिमित्ताने मुले भरपूर पुस्तके वाचतात.
अभ्यासाबरोबरीनेच व्यावसायिक शिक्षणाचे धडेही येथील मुले गिरवतात. यामध्ये गोबरगॅस प्रकल्प, सौरऊर्जा, गोशाळा, बटाटा चिप्स बनविणे, घाणा तेल, मिरची पावडर, पोळी बनविणे, हरभरा पाॅलिश, केस कापणे, शिवणकाम, सुतारकाम, लोहारकाम, रंगकाम, आधुनिक शेती तंत्रज्ञान यांसारख्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण येथील मुलांना दिले जाते. स्वयंशिस्त, स्वावलंबन व संस्कार या त्रिसूत्री चा अंगिकार करुन स्नेहवन मध्ये मुले आनंदात राहतात.
इ. सातवी तील विद्यार्थ्यांनी या अभ्यास भेटीत स्नेहवन मधील मुलांशी सुसंवाद साधला. त्यांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. त्यांच्यातीलच एक होऊन विद्यार्थ्यांनी आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांनी स्नेहवन मधील मुलांसाठी आपल्या घरुन अधिकचा जेवणाचा डबा आणला होता. तसेच सर्व मुलांसाठी गोड पदार्थ म्हणून लाडू व बाकरवडी आणली होती. स्नेहवन मध्ये सर्वांनी एकत्र बसून या सहभोजनाचा आस्वाद घेतला.
विद्यार्थ्यांनी अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दिवाळी मेळ्यामध्ये स्नेहवन मधील मुलांना सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तसेच अशोक देशमाने यांची मुलाखत सृजनदीप व्याख्यानमालेत होणार आहे, याचे निमंत्रण ही देण्यात आले.
सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, सचिव प्रा. विकास कंद, सर्च फाउंडेशनच्या व्यवस्थापक डॉ. स्वाती असबे, देहूचे माजी उपसरपंच सचिन कुंभार ,संचालक प्रशांत काळोखे, अमोल येळवंडे, संदीप टिळेकर, शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, सहशिक्षिका शितल भोसले, योगिता उचाडे, सारिका जाधव, अस्मिता शिराळकर, वृषाली आढाव व कलाशिक्षक देशपांडे सर या अभ्यास भेटीत सहभागी झाले होते.












