- खा. श्रीरंग बारणे यांचे वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ ऑक्टोबर २०२५) :- थेरगाव डांगे चौक परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ग्रेड सेपरेटरची लांबी वाढवण्याच्या सूचना दिल्या. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी डांगे चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
थेरगाव परिसरातील वाहतूक नियोजनाबाबत झालेल्या बैठकीला महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, स्थापत्य प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोजणे, शहरी दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार, कनिष्ठ अभियंता गिरीश गुठे, प्रकल्प सल्लागार राज अंतुर्लीकर आणि माजी नगरसेवक निलेश बारणे उपस्थित होते.
डांगे चौक हा परिसर हिंजवडी आयटी पार्क आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक असल्याने येथे दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. गर्दीच्या वेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना प्रवासात मोठा वेळ खर्ची पडतो तसेच स्थानिक रस्त्यांवरील रहदारीवर ताण येतो.
खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले की,
“थेरगाव डांगे चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ग्रेड सेपरेटरची लांबी वाढवणे अत्यावश्यक आहे. थेरगाव गावठाणकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने तातडीने नियोजन करावे.”
तसेच त्यांनी परिसरातील इतर पर्यायी रस्ते विकसित करण्याच्याही सूचना दिल्या असून, नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने सुधारणा उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.













