- सोसायटी सदस्यांचा एकत्रित उपक्रम; माणुसकीचा दिला संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. ६ ऑक्टोबर २०२५) :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबे पूरग्रस्त होऊन संकटात सापडली आहेत. या दुर्दैवी परिस्थितीत वाकड येथील ‘ला मेलोसा’ गृहसंस्थेच्या रहिवाशांनी माणुसकीचा हात पुढे करत गरजूंना मदतीचा दिलासा दिला आहे.
सोसायटीचे सदस्य निलेश निघोट यांनी आपल्या मित्रपरिवारासह पुढाकार घेत पूरग्रस्त भागांसाठी आवश्यक वस्तू गोळा करून त्या थेट पूरग्रस्त गावांमध्ये पोहोचवल्या.
१ व २ ऑक्टोबर रोजी ला मेलोसा क्लबहाऊसमध्ये मदतीसाठी देणगी पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. या उपक्रमात सोसायटीतील अनेक रहिवाशांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपापल्या परीने योगदान दिले.
गोळा केलेल्या वस्तूंमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ, तेल, बिस्किट पाकिटे, पोहे, साखर, चहा पावडर, टूथपेस्ट, साबण, ब्लँकेट, चादर, टॉवेल, बेड कव्हर यांचा समावेश आहे.
या उपक्रमाच्या आयोजनात आणि साहित्य गोळा, वर्गीकरण तसेच पॅकिंगच्या कामात दत्तात्रेय घोडेकर, अक्षय पाटील, संतोष पवार, राहुल पाटील, अमित पाटील, यशोदीप पाटील, मोहित तितरमारे, चेतन भदाणे आणि पवन गावंडे यांनी मोलाचे योगदान दिले.
ला मेलोसा गृहसंस्थेच्या रहिवाशांचा हा एकतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा प्रेरणादायी उपक्रम इतर समाजासाठीही एक आदर्श ठरत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाने अशाच प्रकारे एकत्र येण्याचे आवाहन रहिवाशांकडून करण्यात आले.













