- वाहनमालकांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अल्टीमेटम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील विविध रस्त्यांवर अनधिकृतरीत्या सोडून दिलेली आणि बेवारस अवस्थेत असलेली वाहने वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने पोलिस आणि महापालिका प्रशासनाने या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. या वाहनांना उचलून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील वाहनतळ आरक्षण क्र. १/२०५ येथे ठेवण्यात आले आहे.
सदर ठिकाणी अनेक वाहने वर्षानुवर्षे पडून असल्याने ती सडलेली व गंजलेली अवस्थेत आहेत. त्यामुळे जागेची टंचाई निर्माण झाली असून, वाहनमालकांनी आपली वाहने ओळखून ती ताब्यात घ्यावीत, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
दिनांक १० ते २४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान वाहनमालकांनी मोशी येथील वाहनतळावर भेट देऊन आपल्या वाहनांची खातरजमा करावी. मुळ कागदपत्रे, गाडी व चेसिस नंबर, आरटीओ नोंदणी क्रमांक सादर करून प्रलंबित दंड अदा केल्यावरच वाहन ताब्यात देण्यात येईल. विहित मुदतीनंतर ताबा न घेतल्यास संबंधित वाहनांचा स्क्रॅप करून विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी कळविले.