न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १० ऑक्टोबर २०२५) :- पिंपळे सौदागरमधील काटे डेअरीसमोर जगताप नगर येथे असलेल्या क्राऊन बेकर्स बेकरीमध्ये रात्री उशिरा काही तरुणांनी कोयता आणि दांडक्यांच्या सहाय्याने हल्ला करून दहशत माजवली. या घटनेत बेकरीतील ₹४० हजारांची रोकड लंपास करण्यात आली असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर चार साथीदार फरार आहेत.
ही घटना दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.४० वाजता घडली. फिर्यादी सादिक युसुफ अन्सारी (वय २६, व्यवसाय: बेकरी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी यश दुर्गे आणि सुमित पुरी (दोघेही रा. पिंपळे सौदागर) तसेच त्यांचे चार अनोळखी साथीदार हे दोन मोटारसायकलीवर बेकरीत आले.
आरोपी यश दुर्गे याने फिर्यादीस “तुला खूप माज आला आहे, मी या एरियाचा भाई आहे” असे धमकीचे शब्द उच्चारून हातातील कोयत्याने उजव्या कानावर वार करून त्याला जखमी केले. त्याच वेळी आरोपी सुमित पुरी व चार साथीदारांनी लाकडी दांडक्यांनी बेकरीतील काच आणि साहित्याची तोडफोड केली.
यानंतर आरोपी बेकरीत आत घुसले आणि गल्ल्यातील दिवसभराची ₹४०,००० रोकड जबरीने चोरून नेली. परिसरात “आम्ही या एरियाचे भाई आहोत” असे ओरडत सर्व आरोपींनी दहशत निर्माण केली आणि दोन्ही मोटारसायकलीवरून पसार झाले.
या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी क्रमांक १ यश दुर्गे आणि आरोपी क्रमांक २ सुमित पुरी यांना अटक केली असून त्यांच्या चार अनोळखी साथीदारांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सपोनि कलगुट्गे करत आहेत.