- बसमालकांना पिंपरी-चिंचवड आरटीओचा कठोर कारवाईचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ११ ऑक्टोबर २०२५) :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणी होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कठोर भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने गुरुवारी (दि. ९) पुण्यात बस ओनर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्यात आली.
बैठकीत शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या बसमालकांवर मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी स्वप्निल भोसले, सहायक अधिकारी युवराज पाटील व सुरेश आव्हाड तसेच असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बसचालकांनी वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि सर्व कागदपत्रे वैध ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
प्रवाशांकडून जादा भाडे आकारले गेल्यास किंवा प्रवासादरम्यान अडचणी आल्यास संबंधितांनी नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाचा फोटो dyrto.14-mh@gov.in या ई-मेलवर पाठवून तक्रार नोंदवावी, असे परिवहन विभागाने आवाहन केले आहे.