- सीईओ आणि कन्सल्टंटकडून बेरोजगार तरुणांची दिशाभूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन, (दि. १५ ऑक्टोबर २०२५) :- बावधन परिसरातील डेटा टेक लॅब्स या कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी अभिषेक भगवानराव बेलेकर (वय २९, रा. नवी सांगवी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अमित आंद्रे (सीईओ, डेटा टेक लॅब्स) आणि हणमंत भोसले (कॉनिक जॉब सोल्युशन, मगरपट्टा येथील कन्सलटंट) यांनी संगनमत करून, कंपनी मल्टीनॅशनल असल्याचे भासवून नोकरीच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी केली.
आरोपींनी फिर्यादींकडून नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने १ लाख रुपये घेतले. फिर्यादीकडून दोन महिने काम करून घेतल्यानंतर ५०,००० रुपयांचा पगार न देता, एकूण १.५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. एवढेच नव्हे, तर इतर चार जण ओंकार देशमुख, वैष्णव टोम्पे, प्रणय चौधरी आणि शुभम पवार यांची मिळून तब्बल ९.७५ लाख रुपयांची फसवणूक केली गेल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपी अमित आंद्रे आणि हणमंत भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक ठाकरे यांच्याकडे आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणांना नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या ऑनलाईन व प्रत्यक्ष फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.













