- भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- पिंपळे सौदागर परिसरातील रस्ते विकासाच्या कामांना गती देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी कुणाल आयकॉन रोड व ट्रायोज सोसायटी परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. स्मार्ट सिटी विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ता कॉंक्रिटकरणाच्या कामाची गुणवत्ता, गती आणि नागरिकांना होणाऱ्या सोयीसुविधांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
या पाहणीदरम्यान काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ट्रायोज सोसायटी रस्त्यावरील कामात तांत्रिक कारणास्तव विलंब होत असल्यास तात्पुरते डांबरीकरण करून नागरिकांना सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
“रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित असतात. विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होणे ही आमची प्राथमिकता आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतूक मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे,” असे काटे यांनी सांगितले.
कुणाल आयकॉन रस्त्याबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, “हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, वाढत्या लोकसंख्या आणि वाहनसंख्येचा विचार करता काँक्रिटकरणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि टिकाऊ रस्त्यांचा लाभ मिळेल.”
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पिंपळे सौदागर परिसरातील विकासकामांना वेग देणे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सोयी-सुविधा वाढविणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही काटे यांनी स्पष्ट केले.













