- प्रकल्पातील बीपीटी खर्चात तब्बल ५ कोटींची वाढ..
- नवलाख उंब्रे येथे २.५ एमएलडी क्षमतेचा टाकी प्रकल्प प्रगतीपथावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी,(दि. ३० ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या भामा आसखेड धरणातून शहराकडे येणाऱ्या जलवाहिनी प्रकल्पात खर्च वाढीचा मुद्दा पुढे आला आहे.
तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंब्रे येथे उभारण्यात येत असलेल्या ब्रेक प्रेशर टँक (बीपीटी)च्या बांधकामाचा खर्च जवळपास पाच कोटी रुपयांनी वाढून तब्बल १२ कोटी ४० लाख ६७ हजार ३३६ रुपये इतका झाला आहे.
या प्रकल्पांतर्गत धरणातून पाणी उचलून नवलाख उंब्रे येथील बीपीटीमध्ये साठवले जाईल आणि तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठवले जाणार आहे. हे काम ओ. बी. सानप कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत २६ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू असून, २.५ एमएलडी क्षमतेच्या टाकीचे बांधकाम सध्या ४० टक्के पूर्ण झाले आहे. परिसरातील सीमा भिंतीचे ५० टक्के कामही पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेगाने सुरू आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक जागा महापालिकेला तळेगाव एमआयडीसीकडून ८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्राप्त झाली. जागा ताब्यात घेण्यात विलंब झाल्याने ठेकेदाराला जवळपास आठ महिने काम करता आले नाही. तसेच जागा खड्ड्यांनी भरलेली असल्याने समतलीकरणासाठी अतिरिक्त भराव टाकावा लागला. त्याचबरोबर स्काडा कक्षासाठी क्षेत्रफळ वाढविणे, रखवालदारांसाठी स्वतंत्र निवास, फर्निचर व्यवस्था, आणि मुख्य प्रवेशद्वारावर आरसीसी कमान बांधणी अशा पूरक कामांचा समावेश करण्यात आला आहे.
या सर्व कारणांमुळे प्रकल्पाचा मूळ खर्च ७ कोटी ६८ लाख १४ हजार २११ रुपयांवरून वाढून सध्याचा खर्च १२ कोटी ४० लाख ६७ हजार ३३६ रुपये इतका झाला आहे. परिणामी, प्रकल्प खर्चात तब्बल ४ कोटी ७२ लाख ५३ हजार १२५ रुपयांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने या कामासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.













