- चौथ्यांदा मुदतवाढ देत निविदेपेक्षा कोटीचे काम वाढवले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात ठेकेदारांना दिल्या जाणाऱ्या मुदतवाढीच्या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नॅशनल मिशन प्रकल्पांतर्गत संगणकांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या ‘टेक नाईन सर्व्हिसेस’ या कंपनीला कराराची मुदत संपूनही वारंवार वाढीचा लाभ देण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थेला डिसेंबर २०२१ मध्ये निविदा प्रक्रियेद्वारे एक वर्षासाठी काम देण्यात आले होते. त्या निविदेत ६६ लाख ५३ हजार ७९९ रुपये इतका लघुत्तम दर नोंदवण्यात आला होता. परंतु, त्यानंतर चार वेळा मुदतवाढ देऊन या कंपनीला निविदेच्या रकमेपेक्षा तब्बल १ कोटी ३३ लाख ७ हजार रुपयांचे अतिरिक्त काम मंजूर करण्यात आले आहे.
त्यातही आता नव्याने ३३ लाख २६ हजार ९०० रुपये इतका खर्च या संस्थेला देण्याचा निर्णय महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने घेतला आहे. हा खर्च ई-गव्हर्नन्स या लेखाशिर्षावरून करण्यात येणार आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कार्यरत एविडन इंडिया कंपनीकडून जीआयएस व संगणक प्रणाली विकसनाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत जुन्या ठेकेदाराला पुन्हा-पुन्हा मुदतवाढ देणे आणि नवीन स्पर्धात्मक निविदा न काढणे या निर्णयावर प्रशासनातील पारदर्शकतेबाबत शंका निर्माण झाली आहे.












