न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गेल्या सात वर्षांपासून एक्स-रे विभागातील तीन अॅनालॉग मशीन बंद असून, सध्या फक्त एकाच डिजिटल मशीनवर सर्व कामकाज सुरू आहे. त्यामुळे रुग्णांना एक्स-रेसाठी तासंतास प्रतीक्षा करावी लागत आहे.
२०१३ पासून कार्यरत असलेली डिजिटल एक्स-रे (डीआर) मशीन पूर्ण क्षमतेने काम करत आहे, परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे ती अपुरी पडत आहे. दररोज सुमारे ३०० रुग्णांचे ५०० एक्स-रे घेतले जातात, तर २२ टेक्निशियन तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत.
वायसीएम अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले की, “किमान १००० एमए क्षमतेच्या डिजिटल मशीनची तातडीची आवश्यकता आहे. याची मागणी २०२० पासून प्रलंबित आहे.”
दरम्यान, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनीही नवीन मशीनसाठी महापालिकेकडे वारंवार प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. उपकरणांच्या कमतरतेमुळे वैद्यकीय सेवांवर ताण निर्माण झाला आहे.











