- महापालिकेचा शून्य खर्च; खासगी संस्थेला काम देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा विचार करून २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन वर्षांत चार वेळा निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्यानंतर, अखेर एका खासगी संस्थेला हे काम देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
“बिल्ड, ऑपरेट अँड मेंटेन (BOM)” या तत्त्वावर ही केंद्रे उभारली जाणार असून, महापालिकेला यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. महापालिका जागा उपलब्ध करून देईल, तर संबंधित संस्था स्वतःच्या निधीतून स्टेशन उभारून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेईल आणि पुढील दहा वर्षे त्याचे संचालन व देखभाल करेल.
शहरात सध्या २३ लाखांहून अधिक वाहने नोंदणीकृत असून, त्यापैकी ५० हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने आहेत. त्यामुळे या उपक्रमामुळे वाहनचालकांना मोठी सुविधा मिळणार आहे. प्रत्येक स्टेशनसाठी सुमारे ६९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, २२ केंद्रांसाठी अंदाजे २० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
या २२ ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन्स…
महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रांगण, जुना पुणे-मुंबई महामार्ग, दुर्गादेवी टेकडी, वाहतूकनगरी (निगडी), बर्ड व्हॅली संभाजीनगर, बजाज ऑटो, कुस्ती संकुल भोसरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअम नेहरूनगर, चिखली, मलनिस्सारण केंद्र चिखली, संतनगर उद्यान कासारवाडी, कोकणे चौक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, लांडेवाडी भोसरी, ‘भक्ती-शक्ती निगडी, संत तुकारामनगर मेट्रो स्थानक, पी. के. चौक, योगा पार्क-पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान-पिंपळे गुरव, वल्लभनगर, ऑटो क्लस्टर आणि राजर्षी शाहू उद्यान.
“लेखा विभागाच्या मंजुरीनंतर स्थायी समितीकडून मान्यता घेऊन सहा महिन्यांत चार्जिंग केंद्रे उभारली जातील,”
– अनिल भालसाकळे, सहशहर अभियंता, महापालिका…











