- मुख्य रस्त्यावर उभारलेला अनधिकृत फलक कोसळण्याची शक्यता..
- महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड, (दि. ५ नोव्हेंबर २०२५) :- चिंचवडगावातील रस्टन कॉलनी परिसरात भाजपच्या माजी उपमहापौर आणि माजी पक्षनेत्याने उभारलेला अनधिकृत फलक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मतदार नोंदणीसंदर्भातील माहिती देणारा हा मोठा लाकडी फलक चिंचवडगावाकडून बिजलीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला लोखंडी दिशादर्शकास आधार देऊन लावण्यात आला आहे.
सदर फलकाच्या मागे विद्युत डीपी असल्याने आणि सध्या वारा-पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे हा फलक कुठल्याही क्षणी रस्त्यावर कोसळू शकतो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून मात्र या अनधिकृत फलकाकडे दुर्लक्ष केल्याची टीका नागरिकांनी केली आहे. नियमबाह्य फलकबाजीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.












