- मावळमध्ये भाजपचा भेगडेंवरील ‘विश्वास हरवला का?’..
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळच्या राजकारणात चर्चांना उधाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ७ नोव्हेंबर २०२५) :- मावळच्या राजकारणात अलीकडे एक नवे समीकरण आकार घेत आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पुणे जिल्हा उत्तर विभागाचे निवडणूक प्रमुख म्हणून भाजपकडून दिलेली जबाबदारी हा या समीकरणातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. या निर्णयामुळे मावळ भाजपमध्ये माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
भेगडे हे मावळ मतदारसंघातील अनुभवी व प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. परंतु यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या ऐवजी बाहेरील आमदाराला जबाबदारी देणे, हा राजकीय संकेत मानला जातो. त्यामुळे “भेगडे यांच्यावरचा पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमी झाला का?” अशी चर्चा मावळ भाजपमध्ये जोर धरू लागली आहे.
दरम्यान, भाजपकडून लांडगे यांना दिलेल्या जबाबदारीमुळे संघटनशैलीत बदल होणार असल्याचे मानले जात आहे. भोसरीतून तीनवेळा निवडून आलेले आमदार लांडगे हे आक्रमक आणि संघटननिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एन्ट्रीमुळे मावळातील भाजप गटांतील अंतर्गत ताण अधिक स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
राज्यात महायुती असली तरी मावळात स्थानिक समीकरण वेगळे आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची ग्रामीण भागातील मजबूत पकड लक्षात घेता भाजपने नवीन संघटनात्मक रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच लोणावळा, तळेगाव आणि वडगावच्या नगरपरिषदांच्या निवडणुकांत या बदलाचा थेट परिणाम दिसेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
पक्षश्रेष्ठींनी भेगडे यांना बाजूला ठेवून आ. लांडगे यांचा दुरान्वये संबंध नसलेल्या मतदारसंघात त्यांना पाठवण्याची खेळी करून काय साध्य केले?. ही निवडणूक रणनीती आहे की पक्षातीलच एखाद्या नव्या चेहऱ्याला आ. लांडगे यांच्या मदतीने प्रमोट करून पुढे आणण्याचा प्रयत्न? हा प्रश्न आता मावळच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
















